BREAKING NEWS "गजराज डेव्हलपर्स" भागीदारीतून सुरू झालेला जमिनी खरेदी विक्री व्यवहार अखेर फौजदारी गुन्ह्यापर्यंत; पुरंदर तालुक्यात...
BREAKING NEWS
"गजराज डेव्हलपर्स" भागीदारीतून सुरू झालेला जमिनी खरेदी विक्री व्यवहार अखेर फौजदारी गुन्ह्यापर्यंत; पुरंदर तालुक्यातील या गावातील परस्पर जमीन विक्री, बनावट कागदपत्रे आणि बोगस धनादेशाचा सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सासवड : जमीन खरेदी-विक्री व्यवसायात भागीदारीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तब्बल 43 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भागीदारी कराराचे उल्लंघन, परस्पर जमीन विक्री, बनावट कागदपत्रांचा वापर आणि बोगस धनादेश देऊन दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.पुरंदर तालुक्यातील या गावातील धक्कादायक प्रकार "हॉर्नच्या किरकोळ कारणातून वाद विकोपाला; तरुणाच्या डोक्यात दगड मारून जीवघेणा हल्ला, तिघांवर गुन्हा"
याबाबत अॅड. ज्ञानेश्वर सिताराम कराळे (वय 59, रा. ज्ञानेश्वरी, गाथा मंदिर रोड, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मनिष दिलीप भागणे (रा. बुधवार पेठ, पुणे), सागर नामदेवराव गरूड (रा. वारजे माळवाडी, पुणे), अरुण हरिभाऊ मांजरे (रा. खेड शिवापूर), अमोल शिंदे (रा. पुणे) आणि निलेश ज्ञानेश्वर गांगर्डे (रा. पिंपळे गुरव, पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुण्याच्या ओळखीतून सुरू झाला व्यवहार
फिर्यादी अॅड. कराळे हे व्यवसायाने वकील असून पुणे येथे वकिली व्यवसाय करतात. त्यांचे मेहुणे सागर गरूड यांच्यामार्फत त्यांची ओळख जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या मनिष भागणे याच्याशी झाली होती. सागर गरूड यांनी मनिष भागणे याच्यासोबत भागीदारीत जमीन व्यवसाय करण्याचा सल्ला दिल्याने कराळे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून व्यवसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
दि. 23 जुलै 2020 रोजी दोघांमध्ये रजिस्टर नोटराईज्ड भागीदारी करारनामा करण्यात आला. "गजराज डेव्हलपर्स" या नावाने भागीदारी संस्था स्थापन करण्यात आली. संस्थेचे पॅनकार्ड, शॉप अॅक्टसह सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. करारानुसार व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण भांडवल कराळे यांनी गुंतवायचे आणि नफ्यातून मनिष भागणे याला 40 टक्के हिस्सा द्यायचा असे ठरले होते.
43 लाखांची गुंतवणूक
फिर्यादीनुसार, मौजे भिवडी (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक 388 मधील जमीन खरेदीसाठी कराळे यांनी मनिष भागणे याला विविध टप्प्यांत निधी दिला. त्यामध्ये 20 हजार रुपये, 10 लाख रुपये, 30 लाख रुपये असे बँक व्यवहारांद्वारे तसेच 2 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. अशाप्रकारे एकूण 43 लाख रुपये मनिष भागणे याला देण्यात आले होते.
या रकमेतून निलेश गांगर्डे यांच्या हिस्स्याची सुमारे 80 आर जमीन "गजराज डेव्हलपर्स"च्या नावाने रजिस्टर नोटराईज्ड विसारपावतीद्वारे खरेदी करण्यात आली. संबंधित जमीन व्यवहारासाठी निलेश गांगर्डे यांना आरटीजीएसद्वारे 20 लाख रुपये आणि रोख 11 लाख रुपये देण्यात आल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
संमतीशिवाय पॉवर ऑफ अॅटर्नी आणि जमीन विक्री
तक्रारीनुसार, जमीन खरेदीनंतर मनिष भागणे याने फिर्यादींची कोणतीही संमती न घेता अरुण मांजरे व अमोल शिंदे यांना जमिनीच्या देखभालीसाठी नियुक्त केले. त्यानंतर मूळ विसारपावती रद्द न करता किंवा भागीदाराची परवानगी न घेता संबंधित जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी अरुण मांजरे व अमोल शिंदे यांच्या नावाने करण्यात आली.
याच पॉवर ऑफ अॅटर्नीच्या आधारे जमिनीतील सुमारे 42 आर क्षेत्रफळ विविध व्यक्तींना विकण्यात आले. प्रताप रामचंद्र शिंदे व शोभा प्रताप शिंदे यांना 22 आर क्षेत्र प्रतिगुंठा 2 लाख 75 हजार रुपये दराने, तर अन्य खरेदीदारास 22 आर क्षेत्र प्रतिगुंठा 2 लाख 65 हजार रुपये दराने विकल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या व्यवहारातून मिळालेली रक्कम आरोपींनी आपापसात वाटून घेतल्याने स्वतःची आर्थिक फसवणूक झाल्याचे कराळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
35 लाखांचा कथित बोगस धनादेश
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर मनिष भागणे याने दि. 18 एप्रिल 2024 रोजी सागर गरूड याच्या हस्ते 35 लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश बँक ऑफ महाराष्ट्र, कसबा पेठ शाखेचा असून "नवनिर्मित महिला बचत गट" या खात्याचा होता.
मात्र संबंधित खाते आणि धनादेश पुस्तिका सुमारे साडेतीन वर्षांपूर्वीच बंद करण्यात आल्याची माहिती बँकेकडून मिळाली. त्यामुळे धनादेश अनादरित होऊन परत आला. आरोपींना हा धनादेश अवैध असल्याची माहिती असूनही फसवणूक करण्याच्या हेतूने तो देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, मनिष भागणे, सागर गरूड, अरुण मांजरे आणि अमोल शिंदे यांनी संगनमत करून भागीदारी करारातील अटींचे उल्लंघन केले. तसेच खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून मूळ भागीदाराची संमती न घेता जमीन व्यवहार केल्याने आर्थिक नुकसान झाले. या संपूर्ण व्यवहारात जमीन विक्रीसाठी विसारपावती करणारे निलेश गांगर्डे यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सासवड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आर्थिक व्यवहार, जमीन विक्रीची कागदपत्रे, पॉवर ऑफ अॅटर्नी आणि धनादेश प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे जमीन व्यवहार क्षेत्रात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS